कोल्हापूर : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. यात कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री खांबावर चढून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नागरिक जबरदस्ती करतात. अशा वेळी एक वेळ वीज गेली तर काही वेळाने येते; मात्र एखाद्याचा जीव गेल्यानंतर तो पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून वीज गेल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून दोषारोप ठेवण्यापेक्षा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.विजेची यंत्रणा ही मोबाईलप्रमाणे सुरू किंवा बंद करता येत नाही. अजूनही ही यंत्रणा मनुष्यावर आधारित आहे. त्यामुळे वीज गेल्यानंतर नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. यासाठी विजेच्या खांबावर चढून दोष नेमका कोठे आहे, तो पाहावा लागतो. अशा वेळी एखादी चूक कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते. लाखो किलोमीटरचे विजेचे जाळे उघड्यावर आहे.ग्राहकाच्या दारापर्यंत वीज आणण्याचे काम सोपे नसते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली, तर एक वाडी, गाव, तालुका, किंबहुना जिल्हा अंधारात जातो. वीज गेल्यानंतर या १९१२, १८००२३३३४३५ व १८००१०२३४३५ टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सेवा २४ तास सुरू आहे. मोबाईल अॅपद्वारेही तक्रार नोंदवू शकता. यासंबंधी वीज बिलाच्या पाठीमागे सूचना केल्या आहेत.ही काळजी घ्या
- घरात आरसीसीबी किंवा एलसीबी ब्रेकर बसवून घ्या. तत्काळ वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीज पुरवठा तत्काळ बंद होऊन जीवितहानी टाळता येते.
- अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री व तपासणी आवश्यक करा.
- वीज उपकरणे, वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित ठेवावीत.
- वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घाला. पुरवठा बंद झाल्याची खात्री करा.
- विद्युत खांबाला किंवा ताणाला जनावरे बांधू नयेत. त्या खाली गोठा किंवा गंजी उभारू नये.
- वीजपुरवठा खंडित झाल्यास २० मिनिटे थांबूनच कंपनीशी संपर्क साधावा.
- बिघाड किंवा विजेची तार तुटल्यास त्याची माहिती वीज वितरण कंपनीला त्वरित द्यावी.
- नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेती पंप, स्टार्टर, वीज मीटरबाबत दक्षता घ्यावी.