इचलकरंजी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : दिल्लीच्या सरकारी शाळेच्या धर्तीवर इचलकरंजी नगरपालिकेच्या ४७ शाळांचे आधुनिकीकरण आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने प्रस्ताव दिल्यास केंद्र व राज्य सरकारकडून विशेष निधी मंजूर करून आणू, असे आश्वासन खा. धैर्यशील माने यांनी दिले.
येथील नगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नगरपालिकेने ३० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ऐतिहासिक पद्धतीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन माने यांनी केले. यावेळी आ. प्रकाश आवाडे, माजी आ. सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रवेशद्वाराच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. माने यांनी नगरपालिकेच्या ४७ शाळांची दुरवस्था झाली आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असल्यास या शाळांचे आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. शहराची लोकसंख्या पाहता महानगरपालिका होणे गरजेचे असून, त्यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक मदन कारंडे, सागर चाळके, राहुल खंजिरे, अशोक स्वामी, राजू बोंद्रे, रवींद्र माने यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळी
१९०२२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन खा. धैर्यशील माने यांनी केले. यावेळी नगरसेवक मदन कारंडे, सागर चाळके, राहुल खंजिरे, अशोक स्वामी, राजू बोंद्रे, रवींद्र माने उपस्थित होते.
छाया-छोटूसिंग