कोल्हापूर : महिलेला जात नसते, महिला ही महिलाच असते. तिला आरक्षण देणे जमत नसेल तर देऊ नका, मात्र तिला मानसन्मान तरी द्या. अशी उद्विग्नता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ व जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर राज्यस्तरीय महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. मेळाव्यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. ‘ताराराणी प्राधान्य कार्ड’चे वाटप, पोषण पंधरवड्याचा प्रारंभ यावेळी करण्यात आला.
‘इतकु दिवस बोललो ओढ्यातील ओढात...’ या कवितेने मेळाव्यातील महिलांना बोलते करत मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, तुम्ही बोलायला शिकला पाहिजे, मनातील जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या मेळाव्यांचा उपयोग नाही. मुळात स्वत:लाच दोष देत बसला तर खच्चीकरण होईल, संसाराचा गाडा हाकत असताना तुमच्यासाठीही थोडा वेळ द्या. ‘रोज एक नियम करा स्वत:वर प्रेम करा....नाहीचे पाढे बंद करा आणि एकटी बाहेर पडा’ असे आवाहनही त्यांनी केले.
‘श्रावणबाळ’ची पेन्शन २ हजार भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेकांच्या पेन्शन बंद केल्या, त्या पुन्हा सुरू करणार असून, उत्पन्नाची मर्यादा २१ हजारांवरून ५० हजार रुपये करणार आहे. त्याचबरोबर परित्यक्ता महिलेचा मुलगा २५ वर्षांचा झाला तरी त्याला नोकरी लागेपर्यंत पेन्शन सुरू ठेवणार असून, आता १ हजारावरून २ हजार रुपये पेन्शन करणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.‘शिकाऊ मुलींना १० हजार विद्यावेतन’कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दहावी व बारावी शिकलेल्या मुलींना जोपर्यंत नोकरी लागत नाही, तोपर्यंत १० हजार रुपये विद्यावेतन सुरू करण्याचा विचार आहे. शासनाच्या वतीने लवकरच रिक्त पदांच्या ५० टक्के भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यामध्ये मुलींना प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.