कोल्हापूर : विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. गुलाल, फटाके उडविण्यासही बंदी घातली आहे. वाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास जाग्यावर ठोका आणि गुन्हा दाखल करा, अशा सूचना सर्व पोलिसांना दिल्या आहेत. आज, गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभा पंचवार्षिक निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लोकशाहीची प्रक्रिया आहे. जय-पराजय हे होत राहणार. निकालानंतर वादावादी किंवा हाणामारीच्या घटना घडतात; त्यामुळे विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. गुलाल, फटाके उडविण्यासही बंदी घातली आहे. वाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास जागेवर ठोका आणि गुन्हा दाखल करा, अशा सूचना सर्व पोलिसांना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कायद्याचे पालन न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिला आहे. सकाळी सहा ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिस्थितीवर मी स्वत: लक्ष ठेवून असणार आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.उमेदवारांसह कार्यकर्त्यांना सूचना
- कोणत्याही विजयी रॅलीला परवानगी देण्यात येणार नाही.
- दुचाकीच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरविणे, फटाका लावणे, गुलाल उधळणे असे कृत्य करून तेढ वाढवितात. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.
- दिवाळी सणाच्या कालावधीत गुन्हा दाखल करून जेलमध्ये जाऊ नये, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.
- गुन्हा दाखल झाल्यानंतर खासगी किंवा सरकारी नोकरी मिळणार नाही. भविष्य काळ खूप अंधारात जाईल, याची जाणीव असावी.
- ५) विजय शांततेत संयमाने साजरा करणे गुन्हा नाही; परंतु पराजित विरोधकांना चिथाविणे, समाजातील शांतता बिघडविणे, आवाजाचे प्रदूषण करणे हे गंभीर गुन्हे आहेत. अशांवर कारवाईची तयारी केली आहे.
आतापर्यंत मतदानप्रक्रिया उत्साहात शांततेत पार पाडून राज्यात सर्वाधिक मतदानाचा विक्रमी टक्का कोल्हापूरच्या जागृत मतदारांनी केला आहे. याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडून कोल्हापूरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा लावूया.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक
मतमोजणी बंदोबस्तपोलीस अधीक्षक - १अप्पर पोलीस अधीक्षक-२उपअधीक्षक - ७पोलीस अधिकारी - १४५पोलीस कर्मचारी - २३००होमगार्ड - १८००स्ट्रायकिंग फोर्स - १०दंगलकाबू पथक - ४जलद कृती दलाच्या तुकड्या - ४