कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असे संजय राऊत म्हणत असतील तर नक्की काका पुतण्या एकत्र येतील असा टोला वैद्यकीयमंत्री हसन मुश्रीफ यांनी मारला. दोन्ही नेते एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी समाधिस्थळाबाबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांना संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्वीपासून एकत्रच आहेत असे वक्तव्य केले आहे. या वाक्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, संजय राऊत म्हणत असतील तसेच होईल. ज्येष्ठ नेते शरद पवार व अजितदादा हे विविध मंडळे व समित्यांवर अध्यक्ष, सचिव असल्याने त्यांना बैठकांसाठी एकत्र यावे लागते असा खुलासा उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळ आल्यावरपण ते दोघे राजकारणातही एकत्र येणार असतील तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच आहे. कारण आम्ही अनेक वर्षे या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळ आल्यावर जाहीर करतील असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
धरणांवर सोलर बसवण्याचा प्रस्तावमुश्रीफ म्हणाले, उन्हाळा वाढल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. हे चिंताजनक असून ते रोखण्यासाठी किंवा त्याचा उपयोग करून घेण्यासाठी धरणांच्या ठिकाणी सोलर पॅनेल किंवा विद्युत निर्मितीची काही यंत्रणा बसवता येते का याचा प्रस्ताव मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देणार आहे.