कोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांना वाटण्यासाठी वन विभागाची २१५ आणि ३१८ हेक्टर जमीन देण्याचे प्रलंबित आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात दिल्लीला जाऊन मंजुरी आणतो असे म्हटले, मात्र प्रकल्पग्रस्तांचा संयम संपला आहे. ते आता मूळ गावे गाठतील असा इशारा आंदोलकांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
येथील वनसंरक्षक कार्यालयासमोर सहा दिवसांपासून चांदोली प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. राजू शेट्टी यांच्यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी आंदोलकांची भेट घेतली. शेट्टी म्हणाले, देशातील आणि राज्यातील हे सरकार मुर्दाड आहे. बड्या लोकांच्या हितासाठी संसद आणि विधानसभा रात्रभर चालवतात, त्यांच्याकडे पन्नास आमदारांना मोजता न येणारी रक्कम देण्याइतका पैसा आहे, परंतु शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक बोलावून प्रश्न सोडवायला वेळ नाही. त्यांना वठणीवर आणले पाहिजे.
डॉ. पाटणकर यांनी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाने पाठवलेल्या जमिनीस सिंचनाच्या सुविधाबाबतचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द केल्याचा उल्लेख चुकीचा असून तो दुरुस्ती करुन फेर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. एक लाख पासष्ट हजार रुपये घर बांधणी अनुदानाची मागणी मान्य करुनच शासनाने आमच्या मूळ गावाकडे यावे, आम्ही तेथे झोपड्या बांधून राहणार आहे असे बजावले. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, ॲड. शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, बाजीराव पन्हाळकर, आनंदा सपकाळ, पी. डी. लाड, एस.आर.पाटील, जयसिंग पन्हाळकर, संतोष गोटल, मारुती पाटील, दाऊद पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
यांनी दिला पाठिंबाया आंदोलकांना सातारा आणि सांगली जिल्ह्यातील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर या जिल्ह्यातील आंदोलकही सहभागी होतील असा इशारा दिला. यावेळी नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीचे डॉ. सुनील पाटील, आनंद कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी पाठिंबा दिला.