कोल्हापूर : कोल्हापूरचा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार आहेत. महायुतीच्या नेत्यांना शाहू महाराजांबद्दल आदर वाटत असेल तर त्यांना बिनविरोध लोकसभेवर पाठवावे, असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणताही वादविवाद नाही, आमचे धोरण पक्के आहे. भाजपविरोधात आमची लढाई आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे राहावी यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले. कोल्हापूरने संपूर्ण देशाला पुरोगामी विचार दिला आहे. हा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर शाहू महाराजांना विजयी करण्याची भूमिका कोल्हापूरकर घेतील.
महायुतीचे नेते श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी आदर व्यक्त करतात. शाहू महाराजांनी राजकारणात येऊ नये, असेही मत व्यक्त करतात. मात्र, कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराजांविषयी महायुतीच्या नेत्यांना खरेच आदर असेल तर त्यांनी शाहू महाराजांना लोकसभेवर बिनविरोध पाठवावे.
माजी खासदार संभाजीराजेंचा निर्णय स्तुत्यआमदार पाटील म्हणाले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. स्वराज्य पक्ष राज्यातील कोणतीही जागा लढवणार नसल्याचे जाहीर केले. राजघराण्यात कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत आहे. माजी खासदार संभाजीराजेंचा हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.