कोल्हापूर : महापूर, कोरोना नंतर महागड्या खतामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आतामहावितरणने वीज दरवाढीचा घाट घातला आहे. या दरवाढीला शेतकऱ्यांचा विरोध असून त्यातूनही शेतकऱ्यांच्या माथी दरवाढ मारली तर रस्त्यावरची लढाईल अटळ असल्याचा इशारा माजी आमदार संजय घाटगे यांनी दिला. महावितरणच्या वतीने वीज दरवाढीबाबत सुनावणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर दरवाढ लागू करण्याबाबत हालचाली असून त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने मंगळवारी महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. त्यावेळी घाटगे बोलत होते. इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले, अगोदरच शेती आतबट्यात आली असताना त्या महावितरणने शेतकऱ्यांना दरवाढीच्या माध्यमातून शॉक देण्याची तयारी केली आहे. हे कदापी खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटाचा विचार करुन सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा सवलतीचा कृषी पंप वीज दर किमान २०२५ पर्यंत कायम ठेवावा. यावेळी जय शिवराय शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी माने, व्यंकाप्पा भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले.दरवाढी करु नये या मागणीचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांना देण्यात आले. प्रताप होगाडे, भारत पाटील-भुयेकर, ‘कुंभी’चे संचालक संजय पाटील-खुपीरेकर, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.
वीज दरवाढ केली तर रस्त्यावरची लढाई अटळ, माजी आमदार संजय घाटगेंचा इशारा
By राजाराम लोंढे | Published: February 28, 2023 3:22 PM