कोल्हापूर : शंभर कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांची वर्कऑर्डर झाली नाही, असा कांगावा केला जात आहे; पण काँग्रेसच्या नेत्यांनी मिरजकर तिकटी किंवा बिंदू चौकात यावे अंबाबाई आणि कपिलेश्वराला स्मरून सांगावे. वर्कऑर्डर झाली नसेल तर मी संन्यास घेतो आणि झाली असेल तर तुम्ही संन्यास घ्या, असे आव्हान महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना दिले.क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी चौकात युवा मेळाव्यात ते बोलत होते. महापालिकेत काँग्रेसची इतकी वर्षे सत्ता होती, पण त्यांनी विकासकामे केली नाहीत. फक्त शहरातील जागेवरील आरक्षण उठवायची आणि आरक्षण टाकायची असलीच कामे केली, असा घणाघाती आरोपही क्षीरसागर यांनी केला.राज्याची स्थापना होऊन ६४ वर्ष झाली यापैकी साडे बावन्न वर्षे काँग्रेसचे दळभद्री सत्ता आहे. पण त्यांनी जनतेसाठी काही केलं नाही. महापालिकेत सत्ता होती पण यांना रंकाळा सुशोभित करता आला नाही. कोल्हापूर शहरात गार्डन पाहिजे होत्या. चांगली क्रीडांगण पाहिजे होती. ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम पाहिजे होती. शहरातील रस्ते, रिंगरोड चांगले झाले पाहिजे होते, पण यांनी काही केलं नाही, याकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.सभेत आमदार जयश्री जाधव, प्रा. जालंदर पाटील, वीरेंद्र मंडलिक, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, महेश जाधव यांची भाषणे झाली. सुजित चव्हाण, कृष्णराज महाडिक उपस्थित होते. यावेळी शुभांगी पोवार, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, विजय देसाई, सुनील कानोरकर, गजानन भुर्के, रजनीकांत वडगांवकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला
तुम्ही तर परमनंट गद्दारजिल्हाप्रमुख आम्हाला गद्दार म्हणतात. हे जिल्हाप्रमुख एवढे नालायक आहेत. माझ्या विरोधात काम करताना प्रत्येक निवडणुकीत पाकिटे घेतली. त्यामुळे तुम्ही तर परमनंट गद्दार आहात, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
कोल्हापूरसाठी तुम्ही काय केले..?आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता क्षीरसागर यांनी, तुम्हीसुद्धा पालकमंत्री, गृहमंत्री होता. राज्यात तसेच महापालिकेत तुमची सत्ता होती. शहरासाठी काय केले आणि किती निधी आणला ते कोल्हापूरच्या जनतेला सांगा, असे आव्हान क्षीरसागर यांनी दिले.
आरोप करणारे उद्घाटनास सोबतरस्त्याच्या कामांवरून माझ्यावर आरोप करणारे माझ्यासोबत कामाच्या शुभारंभास उपस्थित होते आणि आता तेच माझ्यावर आरोप करत आहेत. सर्व घटकांसाठी सरकारने योजना आणल्या, कोल्हापूरसाठी मोठा निधी आणला. त्यामुळे यांच्या पोटात दुखायला लागले आहे, असे क्षीरसागर म्हणाले. यावेळी त्यांनी लाटकर यांचे फोटो दाखविले.
आमच्याकडे सुद्धा व्हीडिओ - आदिल फरासराजेश लाटकरांसोबत मी दहा वर्षे काम केले आहे. क्षीरसागर यांना केवळ बदनाम करण्यासाठी व्हीडिओ बाहेर काढण्याची भीती घालत असाल तर आमचे मोबाईल आम्हाला काढायला लावू नका, आमच्याकडेही व्हीडिओ आहेत, असा इशारा आदिल फरास यांनी दिला. ज्यांनी तीन पक्ष बदलले त्यांनी गद्दारीवर बोलू नये, असेही ते म्हणाले.