कोल्हापूर : गेल्या पंधरा वर्षांत माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट होत गेले. कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि धडाडीने काम केले, तर महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही, असे मत एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांनी व्यक्त केले.
मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ‘माध्यमे आणि महिला’ याविषयावर त्या बोलत होत्या. विविध वृत्तवाहिन्यांमध्ये महिला पत्रकारांची संख्या वाढली. मात्र, अजूनही कामाच्या (ड्यूटी) वेळा लक्षात घेता या क्षेत्रात महिलांना येणे अवघड वाटते. एखाद्या पुरुष निवेदकाचे केस जेव्हा पांढरे होतात. त्यावेळी कोणी चर्चा करत नाही. मात्र, एखाद्या स्त्री निवेदिकेचे केस काळेच असायला हवेत. तिच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू नयेत, अशा प्रकारच्या अपेक्षा केल्या जातात, हे मात्र खटकते. पत्रकारितेत मोठे बदल झाले आहेत. मुद्रित माध्यमांसमोर डिजिटल मीडियाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा या काळामध्ये समाज माध्यमातून येणाऱ्या माहितीची शहानिशा करून कमी वेळामध्ये ती लोकांसमोर सादर करणे हे कौशल्य आपणाजवळ असायला हवे, असे कदम यांनी सांगितले. या कार्यक्रमात चांगले प्रश्न विचारणाऱ्या मीनल पाटील, रसिका शिंदे या विद्यार्थिनींना कदम यांनी पारितोषिक जाहीर केले. संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी कदम यांचा परिचय करून दिला. सचिव डॉ. विनोद निताळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार मानले.