कागल
: गोकूळ दूध संघात राजे विक्रमसिंह घाटगे गटास योग्य प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. आमच्या गटाला कोणी गृहीत धरून चालत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. कागल तालुक्यासह जिल्ह्यात मिळून 100 हून अधिक ठराव आमच्याकडे आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आमची मते निश्चितच निर्यायक ठरू शकतात. योग्य सन्मान न झाल्यास आमचा मार्ग मोकळा आहे, असा स्पष्ट इशारा राजे गटाच्या वतीने आज देण्यात आला आहे.
अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे होते. प्रास्ताविकात प्रा. सुनील मगदूम म्हणाले, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचाच वारसा राजे समरजितसिंह घाटगे चालवीत आहेत. यासाठी त्यांच्या विचारांचा प्रतिनिधी गोकूळमध्ये असणे आवश्यक आहे. सुनीलराज सूर्यवंशी म्हणाले, गोकूळच्या निवडणुकीमध्ये समरजित घाटगे यांनी त्यांचा स्वतःचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका कौतुकास्पद आहे. त्याला सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी पाठबळ देण्याची गरज आहे. राजे बॅकचे अध्यक्ष एम पी पाटील संजय पाटील बेळवळेकर, दत्तामामा खराडे, बॉबी माने, बाबगोंडा पाटील प्रताप पाटील, धनंजय पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आभार उत्तम पाटील बाचणी यांनी मानले.
सत्ताधारी गटाकडून दुर्लक्ष
अमरसिंह घोरपडे म्हणाले की, गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत भाजपच्या वतीने समरजित घाटगे हे चर्चा करतील. असे जाहीर वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मात्र, सत्ताधारी गटाकडून कोणत्याही पद्धतीने आमच्या गटाला विश्वासात घेतले नाही. कोणती चर्चाही केलेली नाही. आम्हाला गृहीत धरून बेदखल करत असाल तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा राहील.
दुसऱ्याचे उबंरठेच झिझवायचे का..?
संचालक युवराज पाटील म्हणाले, मागील तीन निवडणुकींत राजे गटावर अन्याय झालेला आहे. गटाचा प्रतिनिधी गोकूळमध्ये नसल्यामुळे आम्हाला मानणाऱ्या दूध संस्था आणि दूध उत्पादकांची कुचंबणा होत असते. प्रसंगी अडवणूक होते. त्यामुळे दुसऱ्यांचे उंबरे झिजविण्याची वेळ येते. त्यामुळे काहीही झाले तरी आमच्या गटाला प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे.
फोटो कॅप्शन
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राजे गटाच्या ठरावधारक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा कागलमध्ये घेण्यात आला.