सांगली : निवडणूक आचारसंहितेचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांना धमक्या देऊन एलबीटी वसुली करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. प्रशासनात धमक असेल तर एकाच वेळी सर्व व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, असे आव्हान आज, शुक्रवारी एलबीटीविरोधी कृती समितीने दिले. येत्या दोन दिवसात सर्व व्यापारी संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे समितीने सांगितले.कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, धीरेन शहा, आप्पा कोरे, मुकेश चावला, सुदर्शन माने, प्रसाद कागवाडे, गौरव शेडजी, सोनेश बाफना, सुरेश पटेल आदींनी महापालिकेच्या कारवाईचा निषेध केला. समीर शहा म्हणाले की, महापालिका प्रशासनाकडून एलबीटी वसुलीसाठी धमकीसत्र सुरू आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणार नाही, हे वारंवार स्पष्ट केले आहे. सत्ताधारी, प्रशासन व व्यापाऱ्यांची एकत्रित बैठक होऊन कारवाई न करण्याचे ठरले होते. पालिकेनेही जकात व एलबीटी दोन्हीही नको, अनुदान द्या, असा ठराव शासनाला पाठविला होता. एकीकडे सत्ताधारी एलबीटी नको म्हणतात आणि दुसरीकडे मात्र कारवाई केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी आयुक्तांना समज देण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीतही आयुक्तांनी कारवाईचे अस्त्र बाहेर काढले होते. आता विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा फायदा घेण्याचा घाट घातला आहे. त्यातून आयुक्तांना नेमके काय साध्य करायचे आहे? व्यापाऱ्यांवर टप्प्या-टप्प्याने कारवाई केली जात आहे. धमक असेल तर एकाच वेळी सर्व व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. महापालिकेने तीव्र कारवाई केल्यास अथवा बँक खाती गोठविल्यास व्यापारी बेमुदत उपोषण करतील, असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
धमक असेल तर कारवाई कराच
By admin | Published: September 13, 2014 12:11 AM