कोल्हापूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर तसेच वाहनधारकांवर कारवाईची तीव्रता वाढवा, कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील दुकानांवर सलग दोनवेळा दंडात्मक व तिसऱ्यांदा दीर्घकाळ व्यवसाय बंदची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
संचारबंदीत नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी करणे हाच उपाय पुढे आल्याने सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची मुख्यालयात बैठक घेऊन कारवाईची तीव्रता वाढविण्याच्या सूचना केल्या.
अत्यावश्यक सेवेखाली कोविडचे नियम पाळून ३५ आस्थापना सुरू ठेवण्याला शासनाने परवानगी दिली, पण तेथेही नागरिक गर्दी करत आहेत. कारवाईची तीव्रता वाढविण्यासाठी अत्यावश्यक सेवेच्या नियमाखालील व्यावसायिकांनी नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, दोनवेळा दंड केल्यानंतर तिसऱ्यांदा त्याचा व्यवसाय कोरोना कालावधीपर्यंत बंद करावा लागेल, असाही इशारा त्यांनी दिला.
वाहने जप्त करा, मास्कची कारवाई वाढवा
नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा, विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करा, विनामास्कप्रकरणी दंड करा, गुन्हे नोंदवा, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा अशा सक्त सूचनाही अधीक्षक बलकवडे यांनी बैठकीत केल्या.
गल्लीबोळातही गस्ती पथकाचा वॉच
विनाकारण फिरणाऱ्यांवर मुख्य रस्ते व चौकात पोलीस कारवाई करत होते, पण आता आज, मंगळवारपासून गल्ली-बोळात तसेच उपनगरातील रस्त्यांवर नाहक फिरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा, पोलिसांची गस्ती पथके वाढविण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.
गडमुडशिंगीतील माय-लेकीच्या खून तपासाला गती द्या
गडमुडशिंगीतील तेजस्विनी पाटील व अक्षया पाटील या माय-लेकीच्या संशयास्पद खूनप्रकरणी तपासाला गती द्या, अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकरणाची पार्श्वभूमी तपासून काही संशयास्पद बाबींवर तपास करण्यात येणार आहे. मृत दोघींच्या संपर्कातील प्रत्येकाची व्यक्तिगत पातळीवर चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.