कोल्हापूर : शहरात बाजारासाठी आलेल्या गावाकडच्या मंडळींना ठकवून, त्यांच्याकडील खरेदी केलेल्या बाजार-सामानाच्या पिशव्या, त्यातील साहित्यासह हातोहात लांबविण्याची घटना शुक्रवारी दुपारी लक्ष्मीपुरीत घडली. मोटारसायकलवरून आलेल्या या भामट्याने ‘काका, चला तुम्हाला गावात सोडतो,’ म्हणून गाडीवर घेतले व दाभोळकर कॉर्नरला पिशव्यांसह रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेने फसवणूक झालेल्या व्यक्तीस चांगलाच धक्का बसला. घडले ते असे : हातकणंगले तालुक्यातील एका गावात किराणा माल दुकान असलेले हे सद्गृहस्थ बाजार नेण्यासाठी शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात आले होते. बाजार झाल्यानंतर ते बसने गावी जायचे म्हणून निघाले होते. लक्ष्मीपुरीतील शारदा कॅफेजवळ त्यांना एका अनोळखी तरुणाने थांबवले. ‘चला, मीही गावीच निघालो आहे. तुम्हांलाही सोडतो,’ असे त्याने प्रेमळ स्वरात सांगितले. आपल्याच गावातला कुणीतरी तरुण असेल व त्याने आपल्याला ओळखले असेल, या समजुतीपोटी ते गृहस्थ त्याच्या मोटारसायकलवर बसले. हातातील पिशव्या जड होतात म्हणून त्याने गाडीला पुढे हॅँडलला अडकविण्यासाठी मागून घेतल्या. शाहूपुरीत गेल्यानंतर आपल्याकडे सुट्टे पैसे नाहीत, थोडे पैसे द्या म्हणून काही रक्कमही मागून घेतली. पुढे गेल्यावर देतो, अशी थाप त्याने ठोकली. दाभोळकर कॉर्नरला गेल्यावर त्याने गाडी बोळात घातली. येथे आपली बहीण आहे, असे त्याने सांगितले व दोन मिनिटे थांबा असे सांगून त्याने पिशव्यांसह पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ‘पकडा, पकडा’ म्हणून आवाज दिला; परंतु तोपर्यंत त्याने धूम ठोकली होती. ग्रामीण भागांतूनही रोज मोठ्या संख्येने गावाकडची मंडळी मोठ्या तसेच किरकोळ खरेदीसाठी शहरात येत असतात. त्यामध्ये घरगुती सामान-सुमान खरेदीसाठी येणाऱ्या बाया-बापड्यांसह, किरकोळ खरेदी-विक्रीचा व्यवसाय-व्यापार करणारे यांचाही समावेश असतो. लक्ष्मीपुरीसह वेगवेगळ्या ठिकाणी हातोहात लुटण्याचा प्रकार अलीकडे उघडकीस येऊ लागला आहे. हा प्रकार वैयक्तिक आणि एकट्या-दुकट्याच्या बाबतीत घडत असल्याने त्याबाबत लगेचच वाच्यताही होणेही कमी असते. मोटारसायकलस्वारांची भरमसाट गर्र्दी आणि त्यातूनही कुणीतरी आपल्याला काही अंतरापर्यंत मदत करतो आहे, या भावनेतून काही मंडळी हातोहात या भामट्यांच्या सापळ्यात अडकतात. सराईतांची टोळी शक्य बाजारपेठेतून त्या थांब्यांकडे जाणाऱ्यांना हेरून सावज केले जात आहे. बहुधा यात एखादी सराईतांची टोळीही असावी. वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या बाजारपेठा, वेगवेगळे थांबे-ठिकाणे शोधून ग्रामीण मंडळींना सावज केले जात असावे. अशा भामट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे; कारण यात तक्रार कुणाचीच नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या अशा कित्येकांची आतापर्यंत लूट झाली आहे, हे शोधणेही कठीण आहे. आपली फसवणूक झाली तशी अन्य कुणाची होऊ नये, या हेतूने त्या व्यक्तींनी ‘लोकमत’ला स्वत:हून फोन करून ही माहिती दिली.
अनोळखी तरुणांच्या गाडीवर बसाल तर फसाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 12:47 AM