इचलकरंजी : भाजप जातीय आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचे धोरण बदलणार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राजकीय समझौता करायला तयार आहोत, असे जाहीर करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नवी गुगली टाकली. भाजपविरोधात वंचित मोठी टक्कर देईल असा दावाही करायला ते विसरले नाहीत.महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही मतभेद आहेत. हा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर लोकसभेच्या सर्व ४८ जागा आम्ही लढवणार, असा इशाराही ॲड आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना दिला. जागांवरून महाविकास आघाडीमध्येच एकमत झालेले नाहीत त्यामुळेच त्यांचीच आघाडी होईल की नाही, याबाबत शंका असल्याचे सांगत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्षांची फिरकी घेतली. पक्षाच्या मेळाव्यासाठी इचलकरंजीत आलेल्या आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात १५ जागांवर अजूनही तिढा आहे. तो सुटलेला नाही. आघाडी होणार की नाही याविषयी शंका आहे. जागेचे हे भिजत घोंगडे मिटल्याशिवाय वंचितला किती जागा मिळणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी जागा सोडो अथवा न सोडो ४८ जागा लढविण्यासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत. २७ जागांची पूर्ण तयारी झाली आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला मी उद्या जाणार आहे. त्यांचा निर्णय झाल्यावर आम्ही आमचा निर्णय घोषित करू. पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, जिल्हाध्यक्षा क्रांती सावंत (सोलापूर), सोमनाथ साळुंखे, अफरोज मुल्ला उपस्थित होते.
तिन्ही पक्ष मागे लागलेत..राज्यातील तिन्ही प्रमुख पक्ष आम्हाला विचारत नव्हते. हे आम्हाला आघाडीमध्ये पहिल्यांदा घेत नव्हते. मात्र, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 'वंचित'ची सव्वादोन लाख मते आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष आम्हाला आघाडीत सामावून घेण्यासाठी आमच्या मागे लागल्याचे ॲड आंबेडकर यांनी सांगितले.