कोल्हापूर : बारावीतील टक्केवारी घसरू नये म्हणून आत्मविश्वास, एकाग्रता, वेळेचे नियोजन, लिहिण्याचे कौशल्य, मनाची ताकद या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास यश तुमचेच असते, असा यशाचा मंत्र प्रा. शशिकांत कापसे यांनी सांगितला. दृष्टिकोन बदलला तर कोणताही विषय अवघड नसतो, सकारात्मक विचाराने परीक्षेला सामोरे जा, असेही अनुभव सांगितले.
लोकमत बालविकास मंच आणि ओम सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने केशवराव भोसले नाट्यगृहात ‘विज्ञान शाखेतील करिअर’ या विषयावर विद्यार्थी व पालक सुसंवाद करिअर विषय मार्गदर्शन आणि समुपदेशन या कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादनाने झाली. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या संस्थापक शोभा तावडे, शशिकांत कापसे, सविता कापसे, इव्हेन्ट मॅनेजर दीपक मनाठकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर दहावीत ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. कोल्हापुरातील गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिचा सत्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाला.
प्रा. कापसे यांनी सविस्तर विवेचन करताना दहावी, बारावी हे जीवनातील टर्निंग पॉईट असतात. हाच टप्पा जीवन घडविणार की बिघडविणार ते ठरवत असल्यामुळे याला हलक्यात घेऊन चालत नाही. बारावीचा अभ्यास हा दहावीपेक्षा पाचपट अधिक असतो. स्पर्धा वाढली असल्याने तेथे तुमचे अस्तित्व दाखविण्यासाठी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, असे समजून तयारी करावी लागते. मनात ध्येय निश्चित केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, फक्त योग्य ट्रॅक पकडायला लागतो हे लक्षात घ्या असे सांगितले.
कोल्हापुरातील वरणगे पाडळीसारख्या छोट्या गावातून शेतकरी कुटुंबातून येऊनदेखील आलेल्या प्रत्येक अडचणीचा धीराचा सामना करीत पोलीस अधिकारी बनलेल्या इचलकरंजीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी बालपण ते आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास मांडताना स्वत:मध्ये कष्ट करण्याची तयारी असेल आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर जीवनातील कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला अपयश येत नाही असे सांगितले. संकटे आली, अपयश आले म्हणून आत्महत्येचा मार्ग स्विकारु नका, अडचण असेल तर थेट माझ्याशी येऊन बोला असे सांगत गायकवाड यांनी पालकांनीही मुलांचे खच्चीकरण करण्यापेक्षा त्यांचे मनोधैर्य उंचवावे अशी विनंती केली.
चौकट ०१
दक्षता घेऊनच कार्यक्रम
कोरोनामुळे जाहीर कार्यक्रमावर मर्यादा आहेत; पण ‘लोकमत’ने कोरोनाविषयक उपाययोजनांची पुरेपूर काळजी घेऊन केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम घेतला. कार्यक्रमापूर्वी पूर्ण सभागृह सॅनिटराईज करून घेतले गेले. बैठक व्यवस्थाही एक आड अशी ठेवण्यात आली होती. मास्क घालून व सॅनिटायझर लावूनच आत प्रवेश दिला जात होता.
चौकट ०२
फेसबुकवरून ऑनलाईन
काेरोनामुळे भव्य कार्यक्रमावर मर्यादा असल्याने ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवरून या कार्यक़्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
चौकट ०३
मुलासह पालकांनाही मोलाचा सल्ला
मला हे जमेल का, हे मिळाले नाही, ते मिळाले नाही ही कारणे देत बसण्यापेक्षा उठा, ध्येय निश्चित करा, त्याचे मायक्रो प्लॅनिंग करा आणि कामाला लागा. मनात प्रबळ इच्छा असेल तर तुमचे ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अशा आश्वासक शब्दांत यशाचा कानमंत्र देत इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी बारावी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मनोधैर्य उंचावले. आई-वडिलांनी मुलांना वेळ दिला आणि मुलांनीही त्यांचे कष्ट समजून घेतले तर यशस्वी पिढी घडण्यास वेळ लागत नाही, असे अनुभवाचे बोलही त्यांनी सांगितले.