कोल्हापूर : काळम्मावाडी धरणग्रस्तांना गेल्या ४० वर्षांपासून पाण्याबाहेरील हक्काच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी भीक मागण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी वन विभागाने अटकाव करू नये किंवा त्याचा तात्काळ मोबदला द्यावा, अन्यथा ८ जुलै रोजी राधानगरी वन कार्यालयासमाेरील निपाणी-फोंडा मार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेने गुरुवारी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
दूधगंगा प्रकल्पात नऊ गावे व एक वाडी विस्थापित झाली असून काही शेतकऱ्यांची पाण्याच्या बुडित क्षेत्राबाहेर ५२९ हेक्टर जमीन शिल्लक राहिली आहे. यापैकी १६१ हेक्टर जमिनीचे अंतिम निवाडे होऊन १५ टक्के व्याजासह रक्कम देण्यात आली. उर्वरित ३३२ हेक्टर जमिनीचा मोबदला धरणग्रस्तांना मिळालेला नाही. या जमिनी वन विभागाला हव्या असल्याने त्यांच्यासोबत धरणग्रस्तांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र विभागाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये जाण्यास वन विभागाचा अटकाव झाल्यास जशास तसे उत्तर देऊ किंवा जमिनीचा तात्काळ मोबदला देण्यात यावा, अन्यथा निपाणी-फोंडा मार्गावर रास्ता रोको केला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
--