कोल्हापूर : राज्य शासनाचा ‘ब्रेक द चेन’अंतर्गत उद्याेगधंदे, कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी अन् दुसरीकडे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अन्यायकारक आहे. शुक्रवार ते सोमवारपर्यंत लॉकडाऊन पाळण्यास आमचा विरोध नाही; पण इतरदिवशी दुकाने बंद राहणार नाहीत, मग प्रशासनाने हवी ती कारवाई करावी आणि सक्ती कराल, तर अत्यावश्यक सेवा, मेडिकलही बंद ठेवू, असा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सोमवारी दिला. यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी एक दिवसाचा अवधी द्या, मंत्रालयात चर्चा केल्यानंतर यावर निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.
राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात उद्योगधंदे, कारखाने, खासगी आस्थापने नियमाधीन राहून सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. आदेशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजार, मॉल बंद ठेवले जातील, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने जोरदार विरोध करत, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दाैलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, राज्यात सगळी कार्यालये, आस्थापने, उद्योगधंदे, कारखाने सुरू असताना, दुकाने बंद ठेवण्याचे कारण काय. आम्ही आजवर प्रशासनाला सहकार्य करत आलो आहोत. यापुढेही करू, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन बंधनकारक करू, पण कोणत्याही परिस्थितीत दुकाने बंद ठेवणार नाही. प्रशासनाने सगळी दुकाने सील केली तरी चालतील. आम्हाला परवानगी दिली नाही, तर धान्य, किराणा मालाची दुकाने, वैद्यकीय सेवा देणारी आस्थापने व मेडिकलही बंद ठेवू.
यावर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ही नकारात्मक मानसिकता ठेवू नका, असे सांगितले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उद्याचा दिवस द्या, मंत्रालयात चर्चा केल्यानंतर यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, आनंद माने, शिवाजीराव पोवार, अजित कोठारी, विज्ञान मुंडे, प्रशांत शिंदे, संपत पाटील, शांताराम सुर्वे उपस्थित होते.
--
सराफ संघाची नियम स्पष्टतेची मागणी
या विषयावर कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्र्यांची भेट घेतली. पुढील मंगळवारी (दि. १३) गुढीपाडवा आहे. यादिवशी लोक मोठ्या संख्येने सुवर्ण खरेदी करतात. त्यामुळे प्रशासनाने नियम स्पष्ट करावेत, अशी मागणी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केली.
-
फोटो मिळाल्यास स्वतंत्र