कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीजबिलांच्या वाढलेल्या थकबाकीस सरकारची धरसोड वृत्तीच कारणीभूत असताना आता सर्वसामान्य ग्राहकांना कनेक्शन तोडून वेठीस धरले जात आहे. ही सक्ती थांबवली नाही तर कायदा हातात घेऊ, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला. लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची बिले अजिबात भरणार नाही याचा पुनरुच्चारही केला.
महावितरणकडून कनेक्शन तोडले जात असल्याच्या विरोधात कोल्हापुरात शुक्रवारी दुपारी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप वगळता इतर सर्वपक्षीयांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. पंचगंगा पुलावर दर्ग्यासमोर तासभर पुणे-बंगळूर महामार्ग दोन्ही बाजूंकडून रोखून धरल्याने वाहनांच्या २५ किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या. वाहने रस्त्यावर थांबून राहिल्याने बऱ्याच वर्षांनी केवळ आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग तासाभरासाठी पूर्णपणे ठप्प झाला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीजबिल विरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्का जाम आंदोलनात सहभाग घेतला. उन्हाच्या कडक झळांची पर्वा न करता आंदोेलकांनी तापलेल्या महामार्गावरच ठिय्या मारला. भरणार नाही, भरणार नाही, वीजबिल भरणार नाही, अशा जोरदार घोषणा देत लढ्याचा निर्धार अधिक पक्का केला.
आंदोलनात विक्रांत पाटील-किणीकर, प्रताप होगाडे, उदय नारकर, संजयबाबा घाटगे, प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, बाबा पार्टे, बाबासो देवकर, जयकुमार शिंदे, प्रा. सुभाष जाधव, राजेंद्र पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, समीर पाटील, रवी जाधव, वसंतराव पाटील, वैभव कांबळे, सचिन जमदाडे, रमेश मोरे, स्वस्तिक पाटील, मारुती पाटील, अशोक पोवार यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
चौकट ०१
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा पूर्वेतिहास माहीत असल्याने पोलिसांनी अधिक दक्षता घेतली होती. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५० पोलीस, सात व्हॅन, अग्निशमक सेवा महामार्गावर सकाळी अकरा वाजल्यापासून तैनात ठेवण्यात आली होते. महामार्ग रोखल्यानंतर कसबा बावडा, शिये मार्गे शहरातील वाहतूक वळवण्यात आली, तरी लांब रांगा लागल्या होत्या.
चौकट ०२
साधारण एकच्या सुमारास आंदोलक महामार्गावर येऊन बसले. पंधरा मिनिटांनंतर पोलीस शेट्टी यांना ताब्यात घेण्यास पुढे सरसावल्यावर आंदोलक अक्षरश: पोलिसांवर तुटून पडले. शेतकऱ्यांनी शेट्टींच्या भोवती कडे केल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर पोलीस मागे हटल्यानंतर पुढे तासभर आंदोलन शांततेत सुरू राहिले.