कोल्हापूर : गुरुवारी (दि. ३१) सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या तरुणाईला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लगाम घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख १२ ठिकाणांवर नाकाबंदी करण्यात येणार असून, संपूर्ण शहरात आठ गस्तीपथके गस्त घालणार आहेत.
गुरुवारी रात्री जमावबंदीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मद्यपींना थेट वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. कोरोना संसर्गाची शक्यता असल्याने गुरुवारी रात्री ११ नंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच विनाकरण वाहनावरून फिरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. आठ मोबाईल पेट्रोलिंग वाहनांद्वारे संपूर्ण शहर व परिसरात गस्त घालण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रमुख १२ ठिकाणी नाकाबंदी करुन तपासणी होणार आहे.
असा असेल पोलीस बंदोबस्त...
पोलीस उपअीक्षक : ०२
पोलीस निरीक्षक :०६
सहायक व उपनिरीक्षक : १०
पोलीस : १५०
होमगार्ड : ६०
वाहतूक कर्मचारी :२०
मोबाईल व्हॅन : ०८