भारत चव्हाण - कोल्हापूर -राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराचे व गुंडगिरीचे पुरावे असल्यास आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे जाहीर आव्हान राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे प्रमुख रवींद्र पंदारे यांनी गुरुवारी विरोधकांना दिले. जी मंडळी बँकेच्या कामकाजात कधीही सहभागी झाली नाहीत, तीच खोटे आरोप करून बॅँकेची व संचालकांची बदनामी करून मते मागत आहेत. त्यांना बॅँकेचे सभासद नक्की धडा शिकवतील, असा विश्वासही पंदारे यांनी व्यक्त केला.गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेची निवडणूक येत्या रविवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना पंदारे यांनी विरोधी पॅनेल प्रमुखांच्या आरोपांचे खंडन केले. आम्ही स्वच्छ, पारदर्शक आणि काटकसरीचा कारभार करण्यावर जोर दिला म्हणूनच बॅँके ची आर्थिक प्रगती झाली आहे. आम्ही ४० लाखांचे सॉफ्टवेअर ७५ लाखांना खरेदी केले, असा आरोप बाळासाहेब घुणकीकर यांनी केला आहे. घुणकीकर यांनी बॅँकेच्या कामकाजात कधीही भाग घेतला नाही. त्यामुळे त्यांना कसलीही माहिती नाही. मुळात कोअर बॅँकिंग सुरू करताना जे सॉफ्टवेअर खरेदी केले, त्याची किंमत ३५ लाखांची आहे. त्यांची बिले आहेत, ती त्यांनी बॅँकेत येऊन पाहावीत, म्हणजे खरे काय ते कळेल. संचालकाच्या नातेवाइकाची गाडी भाड्याने घेऊन त्यावर पैसे खर्च केल्याचा आरोपही असाच बिनबुडाचा आहे. महिन्याला १२ हजार रुपये भाडे देत असताना ते ४० हजार रुपये दिल्याचा कांगावा केला आहे. आमची बॅँक गुंडांचा अड्डा आहे, तर मग त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद का दिली नाही? त्यांना कोणी अडविले नव्हते. खोटी बिले सादर करून प्रवासभत्ता उचलला असेल तर बॅँके च्या आॅडिटमध्ये हा मुद्दा का आला नाही, मग यांनाच खोट्या बिलांचा कसा साक्षात्कार झाला.कुटुंब कल्याण योजनेत २ कोटी ५७ लाख रुपये शिल्लक आहेत. वर्षातून दोन वेळा सभासदांच्या पगारातून कपात करून पैसे घेतो. या योजनेद्वारे मृत सभासदाला ३० टक्के कर्जमाफी दिली जाते. निधी वाढल्यावर कर्जमाफीची ही सवलत शंभर टक्के केली जाईल, असे पंदारे यांनी सांगितले. १९८७ मध्ये कर्जाला २३ टक्के व्याजदर होता. त्यामुळे लाभांश आणि बोनस देणे शक्य होते. मात्र, २००७ पासून कर्जाचे, ठेवीचे व्याजदरही कमी झाले. याचाही विचार होणे आवश्यक आहे. आमच्याविरुद्ध विरोधकांकडे ठोस असे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करून ते सभासदांची दिशाभूल करीत आहेत.
भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यास गुन्हे दाखल करा : पंदारे
By admin | Published: March 19, 2015 11:39 PM