कुरुंदवाड : गावात बेकायदेशीर दारू विक्री करताना अथवा अवैध व्यवसाय करताना सापडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून दंडाचा बोजा सातबाऱ्यावर नोंद करण्याचा व त्यांची मालमत्ता सील करण्याचा निर्णय शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामसभेत घेण्यात आला.या ठरावाची नक्कल गावचावडीसमोर डिजिटल फलक करून लावण्याचा तसेच गावचावडी चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद करण्याबाबत चर्चेतून निर्णय घेण्याचा ठराव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत आयत्या वेळच्या विषयावर हा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच शर्मिला टाकवडे होत्या.दरम्यान, दारूबंदी, गावचावडीसमोरील सार्वजनिक स्वच्छतागृह हटविणे, सासणे गल्लीतील तुंबलेल्या गटारीवरून ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन व तक्रारदार यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला.गावचावडीसमोर शासकीय योजनांना मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. लिपिक जब्बार नालबंद यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. ग्रामसेवक व्ही. ए. शेवरे, सरपंच टाकवडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांना उपस्थित नागरिकांनी मंजुरी दिली. मात्र, आयत्या वेळच्या विषयात सचिन कोळी यांनी दारूबंदीचा ठराव असताना राजरोसपणे बेकायदेशीर दारू विक्री केली जात. ते बंद करावे नाहीतर आम्हाला रीतसर परवानगी द्यावी, असा विषय येताच वादावादीला सुरुवात झाली. अखेर सरपंच टाकवडे यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तक्रारदार शांत झाले. यावेळी उपसरपंच शिवानंद कोरबू, शक्ती पाटील, बाबासो हेरवाडे, आरिफ मुजावर, तेजस्विनी पाटील, ललिता जाधव, रेश्मा चौधरी, मालन कुंभार, अनिता मोरडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
दारू विकल्यास सातबाऱ्यावर बोजा, मालमत्ता सील करणार; कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने केला ठराव.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:46 IST