कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकरभरती स्थगित करावी, या मागणीसाठी आज, रविवारी मुंबईत निदर्शने करण्यात येणार आहेत. हे आंदोलन राज्य शासनाने पोलिसी बळाने दडपण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटून उटेल. यानंतर राज्यात होणाऱ्या उद्रेकास शासन जबाबदार राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील, सचिन तोडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून दिला. नोकरभरती स्थगित केल्याचे लेखी मिळाल्याशिवाय कोल्हापुरात माघारी येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दिलीप पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती दिली असून यावर पुढील दीड महिन्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य शासनाने ५० दिवसांसाठी नोकरभरती, तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी परीक्षा स्थगित कराव्यात, या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करीत आहोत. यावेळी प्रकाश सरनाईक, शैलश जाधव उपस्थित होते.
चौकट
गाडी मोर्चा रद्द, मुंबईत निदर्शने
वारंवार मागणी करूनही नोकरभरती स्थगित केली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज, मुंबई येथे मंत्रालयावर गाडी मोर्चा काढण्याचे नियोजन होते. गाडी मोर्चा रद्द करुन मुंबईत निदर्शने करण्यात येणार आहे. आज, सोमवारी सकाळी ६ वाजता १०० पेक्षा जास्त सकल मराठा बांधव दसरा चौक येथून मुंबईला रवाना होणार आहेत.
मुंबईत गनिमी कावा
मुंबईतील आंदोलन सरकार पोलीस बळाचा वापर करून दडपणार हे अपेक्षित धरून प्लॉन बी केला आहे. यानुसार १८० महिला आणि २०० कार्यकर्ते रेल्वेने मुंबईत अगोदरच पोहोचले आहेत. कोल्हापूर स्टाईलने आंदोलन केले जाणार असून ठिकाणही गुप्त ठेवले असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले.
चौकट
नोकरीपासून बाजूला ठेवण्याचा डाव
सरकार घाईगडबडीने मुद्दामहून नोकरभरती करीत आहे. ३५ हजार नोकरभरती होणार असून या भरतीपासून मराठा समाजाला बाजूला ठेवण्याचा सरकाराचा डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला. मराठा आरक्षणासाठी ४२ जण शहीद झाले असून आता ४२०० जण शहीद होण्याची वाट पाहता काय, असा सवालही त्यांनी केला.