कोल्हापूर : नांदेड येथे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासाठी एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोरोनाचे कारण पुढे करत गुन्हे नोंदवले. त्यामुळे संतप्त झालेले खासदार संभाजीराजे यांनी, ‘गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा’ असे ट्विट करून सामान्य गरीब मराठा बांधवांवर अशा पद्धतीने अन्याय कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला.
मराठा समाजाच्या मागण्या महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. शासनाने त्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षणांसह इतर प्रश्नांसाठी नांदेड येथे शुक्रवारी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन झाले. या आंदोलनानंतर सहभागी झालेल्या मराठा बांधवांवर कोरोना प्रादुर्भावाचे निमित्त पुढे करत पोलिसांनी गुन्हे नोंदवले. त्यावर खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होताना मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. मग राजकीय पक्षासाठी वेगळा न्याय व मराठा समाजाला वेगळा न्याय कशासाठी देता? असाही प्रश्न उपस्थित करत नांदेडमधील मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलकांच्या मी पाठीशी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.