कोल्हापूर : पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तक्रार ही १ जुलैपासून थेट संगणकावर ‘आॅनलाईन’ डायरीमध्ये नोंदवावी. याबाबत काही अडचणी असतील तर पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा, यासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या तांत्रिक अडचणींचा आढावा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी मंगळवारी ‘वायरलेस’वरून घेतला. पोलिसांच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस ठाणी ‘आॅनलाईन’ पद्धतीने जोडण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण, आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद ‘आॅनलाईन’ करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक वर्मा यांनी नुकतेच दिले आहेत. अंमलबजावणी १ जुलैपासून करण्याच्या सूचना त्यांनी या जिल्ह्यांतील सर्व पोलिसांना ‘वायरलेस’वरून दिल्या. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक जिल्ह्यातील पोलिसांच्या वायरलेसवर ‘आयजी साहेब बोलणार आहेत. सर्व पोलिसांनी पोलीस ठाण्यात वायरलेस सेटसमोर हजर राहावे,’ अशा संदेश आला. काही क्षणांतच ‘मी आयजी संजय वर्मा बोलतोय,’ असे म्हणून त्यांनी ‘आॅनलाईन’ डायरीसंदर्भात चार मुद्द्यांवर सूचना केल्या. १ जुलैपासून पोलीस ठाण्यात दाखल होणारी तक्रार थेट संगणकावर ‘आॅनलाईन’ डायरीमध्ये नोंद करावी. जनरेटर, संगणक, बॅटरी यासह काही तांत्रिक अडचणी असतील तर त्वरित पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
‘आयजीं’नी घेतला ‘आॅनलाईन’ डायरीचा आढावा
By admin | Published: June 10, 2015 12:44 AM