इचलकरंजी : नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याचा निर्णय झाला असला तरी दवाखान्याकडील डॉक्टर्स, परिचारिकांसह ५२ जणांना सेवेत कायम करण्याचे प्रकरण सोळा वर्षे लटकत राहिल्याने दवाखाना क्षेत्रात अस्वस्थता वाढली आहे. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदल्या अन्यत्र होण्याचा प्रश्नसुद्धा सतावत आहे.नगरपालिकेने नव्याने बांधलेल्या आयजीएम दवाखान्यामध्ये केईएम हॉस्पिटल १२ आॅगस्ट १९९६ ला स्थलांतरित करण्यात आले. ३५० खाटांच्या या इमारतीत १७५ खाट सुरू आहेत. या दवाखान्यामध्ये सध्या नगरपालिकेतर्फे बाह्यरुग्ण तपासणी, मेडिकल, सर्जिकल, मॅटर्निटी असे विभाग सुरू असून, फिजिओथेरॅपीची सोय आहे. तसेच नेत्र, दंत विभागही स्वतंत्र असून, क्ष-किरण प्रयोगशाळा व रक्त-लघवी तपासणी विभागही आहेत.अशा या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम करून घ्यावे, या मागणीसाठी वारंवार आंदोलने झाली, तसे शासनदरबारी प्रयत्न झाले; पण यश आलेले नाही. अशा या प्रलंबितांचा प्रश्न अद्यापही बाकीच आहे. अशा स्थितीत शासनाने दवाखाना हस्तांतरित करून घेतला असून, यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नसल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच दवाखाना शासनाकडे हस्तांतरित झाल्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या विभागीय व जिल्हास्तरावर होणार आहेत. त्यामुळे सुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (प्रतिनिधी)इचलकरंजीमध्ये गावभागात संस्थानकाळापासून केईएम हॉस्पिटल आहे. या दवाखान्याकडे ७५ खाटांची सोय होती. या ‘आयजीएम’कडे सन १९९६, १९९७ व १९९९ अशा तीन टप्प्यांमध्ये नव्याने चार डॉक्टर (पैकी दोन कन्सल्टंट), ३२ नर्सेस (पैकी सहा पुरुष), तीन क्ष-किरण, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तीन फार्मासिस्ट, दोन टेलिफोन आॅपरेटर, तीन वाहनचालक, दोन प्लंबर व एक फिजिओथेरॅफिस्ट असे ५४ अधिकारी व कर्मचारी नेमून घेण्यात आले. अशा सर्वच अधिकारी व डॉक्टरांना सेवेत कायम करावे, अशा आशयाचा प्रस्ताव २००१ मध्ये नगरपालिकेच्या सभेत मंजूर करून तो शासनाला पाठविण्यात आला. मात्र, तो अद्यापही प्रलंबित आहे.
‘आयजीएम ५२ जणांची सेवा अनिश्चितच
By admin | Published: June 22, 2016 12:02 AM