इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासून पगार थकला आहे. त्यामुळे कर्मचारी उद्या, मंगळवारपासून काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज, सोमवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे ठेकेदाराला घेऊन कर्मचाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. नगराध्यक्षांनी याचा पाठपुरावा करून दोन दिवसांत पगार देण्याचे आश्वासन दिले.नगरपालिकेच्या आयजीएम रुग्णालयात सोळा वैद्यकीय अधिकारी व सतरा कर्मचारी ठेकेदारामार्फत काम करतात. गत तीन महिन्यांपासून या सर्व ३३ कर्मचाऱ्यांचा पगार थकला आहे. दिवाळी सणामध्ये इतर कर्मचाऱ्यांना पगार, बोनस व सुटी मिळते. मात्र, सुटी नसताना दिवाळी सणामध्ये काम करूनही पगारही वेळेवर मिळत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांसमोर मांडली. त्यामुळे उद्यापासून आम्हाला नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करावे लागेल, असा पवित्राही घेतला. दरम्यान, कोल्हापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून नव्याने आलेल्या प्रस्तावात एप्रिलपासूनच्या सर्व महिन्यांची भविष्य निर्वाह निधीची कपात एकत्रित करून घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात काहीच मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.या निर्णयाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडे संमती दिली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार कमी असल्याने त्यांना हे न पेलवणारे आहे. एप्रिलपासून ते आजपर्यंतचा भविष्य निर्वाह निधी किमान दहा हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो. त्यामुळे दोन महिन्यांचा पगार एकत्रित कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कर्मचारी काय करणार, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नगरपालिका व ठेकेदाराच्यावतीने दोन-दोन महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी पगारातून कपात करावा, अशी मागणी करणार असल्याचेही ठेकेदार सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितली. (प्रतिनिधी)
‘आयजीएम’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार थकीत
By admin | Published: October 27, 2014 9:26 PM