इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटलला ३०० बेड व मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी मान्यता देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले. यावेळी ‘आयजीएम’मधील ‘त्या’ प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातील प्रश्न येत्या दोन दिवसात मार्गी लावतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या दोन्ही मंत्र्यांची आमदार आवाडे यांनी भेट घेतली. यावेळी आयजीएम व वस्त्रोद्योग संदर्भातील विविध प्रश्नांचे निवेदन दिले.
त्यामध्ये रुग्णालयातील रिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यासह आमदारांच्या स्थानिक विकासनिधीतून तीन कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी मिळावेत व हॉस्पिटलच्या देखभाल, दुरूस्ती व आवर्ती खर्चासाठी प्रतिवर्षी अकरा कोटी असे पाच वर्षांसाठी ५५ कोटी रुपये रकमेऐवजी अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील सीपीआरनंतरचे मोठे रुग्णालय आयजीएम असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा. शहराची लोकसंख्या व कोरोनाचा फैलाव पाहता, लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. त्यासाठी स्थानिक विकासनिधी सन २०२१-२२मधून अतिरिक्त तीन कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता द्यावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत.
चौकट
वस्त्रोद्योगाच्या मागण्यांचे निवेदन
२७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी जाहीर अतिरिक्त ७५ पैशांची सवलत देण्याचे अधिवेशनात जाहीर करून दीड वर्षे झाली. साध्या यंत्रमागासाठी एक रुपयांची अतिरिक्त सवलत व ५ टक्के व्याज अनुदान जाहीर केले असून, या संदर्भातील २,३०० प्रकरणे राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. अद्यापही या प्रश्नांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तातडीने याची अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. यावेळी इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, नारायण दुरुगडे, पुष्कराज पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी
१४०६२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटल व वस्त्रोद्योग संदर्भातील विविध प्रश्नांचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.