इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात स्वाईन फ्लूसंदर्भात तयार करण्यात आलेली यंत्रणा म्हणजे दिखाऊपणा आहे. आयजीएम रुग्णालयातील गैरसोयींबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असूनसुद्धा सध्या सर्वत्र थैमान घातलेल्या स्वाईन फ्लूसारख्या आजाराबाबतसुद्धा आयजीएम रुग्णालय यंत्रणा ढिम्म असल्याचे दिसत आहे.बुधवारी एका खासगी रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्याचबरोबर शहराशेजारी असलेल्या एका गावातील रुग्णालाही स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याने तेथील एमबीबीएस डॉक्टरांनी आयजीएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. या दोन्ही रुग्णांच्या नातेवाइकांना आयजीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वाईन फ्लूसंदर्भात उपचारासाठी दुपारी सव्वाचारनंतर येण्याचा सल्ला दिला. दुपारी एकनंतर सव्वाचारपर्यंत या रुग्णांनी काय करावे, अथवा काय करू नये, यासंदर्भात त्यांना कोणताही सल्ला न देता जाण्यास सांगितले.संबंधित रुग्ण बाहेर जाऊन अथवा घरी जाऊन इतर नागरिकांच्या संपर्कात आल्यास त्यांनाही लागण होण्याची शक्यता असते. याचे गांभीर्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसले. याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. प्रतिनिधींनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बनगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही निष्काळजीपणा दाखवीत साडेचारनंतर येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आयजीएम प्रशासनाला सांगून रुग्णांच्या उपचारासंदर्भात व पुढील प्रक्रियेसाठी निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर ‘आयजीएम’ची यंत्रणा खडबडून जागी झाली. रुग्णाची तपासणी करून पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे तत्काळ हलविण्यास सांगितले. तसेच दुसऱ्या रुग्णाला आलेल्या अहवालाप्रमाणे स्वाईन फ्लू उपचाराची औषधे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन देण्यात आली. या बेफिकीर कारभारामुळे आयजीएम रुग्णालय मात्र पुन्हा चर्चेत आले. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ सूचना देऊन स्वाईन फ्लूसंदर्भात आवश्यक यंत्रणा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
‘आयजीएम’ची यंत्रणा ढिम्मच
By admin | Published: March 04, 2015 9:23 PM