तानाजी घोरपडेहुपरी : महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील अग्रगण्य नेते स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक थोर समाजसेवक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई माधवराव बागल यांच्या जयंती दिनीच यळगूड (ता. हातकणंगले) या त्यांच्या जन्मगावी त्यांची उपेक्षा झाल्याचे पाहावयास मिळत आहे.जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात त्यांची जयंती साजरी होत असताना, यळगूड येथे त्यांच्या पुतळ्याला साधा अर्पण करण्याचे सौजन्य वारसनी, ग्रामपंचायतीने किंवा एखाद्या संस्थेने दाखविले नाही.छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले शेकापचे ज्येष्ठ नेते भाई माधवराव बागल यांच्या आचारविचारांचा आदर्श घेऊन सहकाररत्न वसंतराव मोहिते यांनी यळगूड येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. मोहिते यांचे गावाकडे लक्ष होते, तोपर्यंत या पुतळ्याची देखभाल ग्रामपंचायत व यळगूड उद्योगसमूह करीत होता. सध्या दुर्लक्ष झाल्याने पुतळा परिसराला अवकळा प्राप्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.पुतळा परिसरात खुरट्या वनस्पती वाढल्या आहेत. रहिवासी ग्रीलवर कपडे वाळत घालतात. बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडले असून, कचरा साचला आहे. याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहेच, शिवाय बागल यांच्या नावाने संस्था चालविणाऱ्या व सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या त्यांच्या स्वयंघोषित अनुयायांनाही हा प्रकार का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.बागल यांचे नाव घेतल्याशिवाय भाषणाची सुरुवात करीत नाहीत, अशा मंडळींनीही दुर्लक्ष केल्याने त्यांना नाव घेण्याची नैतिकता उरली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात बागल यांच्या जयंती कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांनी त्यांच्या जन्मगावी पुतळा व परिसराला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी गावकऱ्यांची इच्छा व्यक्त करीत आहेत, अशी परिस्थिती आहे.
माधवराव बागल यांची जन्मगावीच उपेक्षा, जयंतीदिनी पुतळ्याला ना कोणी पुष्पहार घातला ना अभिवादन केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 2:16 PM