जयसिंगपूर : सध्याच्या धकाधकीच्या युगात माणसांतील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासण्याची आवश्यकता असून, विश्वशांतीची गरज आहे. यासाठी इज्तेमाचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन मौलाना मुबीन (पुणे) यांनी केले.उदगाव (ता. शिरोळ) येथे बुधवारी इज्तेमाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. सकाळी साडेसहा वाजता दिलावर मुल्लाणी (कोल्हापूर), दुपारी मौलाना उस्मान (पुणे), सायंकाळी पाच वाजता मौलाना साद (औरंगाबाद), तर रात्री आठ वाजता मौलाना मुबीन यांनी उपस्थितांना संदेश दिला.दरम्यान, बुधवारी कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, सीमाभागातील सुमारे दोन लाख मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. या इज्तेमासाठी विविध सोयीसुविधा पुरवल्या आहेत. यामध्ये डॉक्टर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवेचीही सोय करण्यात आली आहे. आज, गुरुवारी इज्तेमाचा शेवटचा दिवस असून, सुमारे पाच लाखांहून अधिक मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत. रात्री नऊ वाजता दुवापठण हाजीज मन्सूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी सुमारे ४० एकर परिसरात शिरोळ रोड, कुंजवनलगत, गावठाण तळ, स्टेशन रोळ या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. मुख्य मंडप १२० एकरांमध्ये उभारण्यात आला आहे. यामध्ये विविध गावांच्या भागासाठी भोजन, पिंडालाची सोय करण्यात आली आहे.बुधवारी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी इज्तेमाला भेट दिली. सुरक्षेसाठी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके, शिरोळचे वसंत बागल यांच्यासह ७० पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत. ( वार्ताहर )व्यवस्था : महामार्गावरील वाहतुकीत बदलपोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या आदेशाने महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत ही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये उदगाव ते जयसिंगपूरला जाणाऱ्या वाहनांना बायपासमार्गे सोडण्यात येणार आहे, तर कोल्हापूरहून सांगलीला जाणाऱ्या वाहनांना तमदलगे बायपासवरून जयसिंगपूर रेल्वे स्टेशनमार्गे सोडण्यात येणार आहे.
विश्वशांतीसाठी इज्तेमा
By admin | Published: March 31, 2016 12:24 AM