कोल्हापूर : अंबर दिवा कोणी वापरायचा याबाबत महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निकषामध्ये बसत नसतानाही कोल्हापूरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेंद्र कावळे हे स्वत:च्या इनोव्हा गाडीवर अंबर दिवा लावून राजरोसपणे फिरत आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘सत्यमेव जयते’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समीर पठाण यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे केली. याबाबतचे पुरावेही त्यांनी सादर केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे हे स्वत:च्या इनोव्हा (एमएच ३८ जे १८८१) या गाडीवर बेकायदेशीरपणे अंबर दिवा लावून राजरोसपणे फिरत आहेत. त्यांनी दिवा लावलेल्या गाडीचा फोटो व अंबर दिव्या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे राजपत्र काढून पुराव्यानिशी निवेदन देत आहोत. कावळे यांनी अंबर दिवा शासकीय परिवहन सेवेच्या किंवा पोलिस विभागातील मोटार परिवहन यांच्याकडून खरेदी केला आहे का? की अन्य दुकानातून खरेदी केला आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी. कावळे हे आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या गाडीवर बेकायदेशीर जाहीरपणे अंबर दिवा लावून फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर केंद्रीय मोटार कायदा अधिनियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करावी. आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन सेवा पुस्तकात त्याची नोंद व्हावी. याबाबत लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर समीर पठाण यांच्यासह उपाध्यक्ष दत्तात्रय तोरस्कर, सचिव सतीश भोसले, खजानिस दुष्यंत माने यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
त्यांच्या गाडीवर बेकायदेशीर अंबर दिवा
By admin | Published: May 29, 2016 1:18 AM