कोल्हापूर : मौजेवाडी रत्नागिरी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने लादे-डबाणे गल्लीतील घरांची बेकायदा पाडापाडी करून ग्रामस्थांचे नुकसान केले आहे, तसेच सिमेंटचे पाइप टाकण्यासाठी प्रशासनाची मान्यता न घेता रस्त्याची खुदाई केली आहे. तरी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.गोरखनाथ बुणे, सोमनाथ लवाळे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना याबाबतचे निवेदन दिले. सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगळे, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर, अरुण शिंगे यांनी संगनमताने जेसीबीच्या साह्याने घरांची पाडापाडी केली. गल्लीच्या दोन्ही बाजूला बेकायदा रस्त्याची खुदाई करून विनापरवाना सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतली नाही. निविदा प्रक्रिया राबवली नाही. नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. तसेच आर्थिक लाभातून सरकारी मालकीच्या गट नं ७ ब मधील पाण्याच्या टाकीशेजारी मोबाइल कंपनीचा टॉवर उभारला आहे. त्यासाठीही परवानगी घेतली गेली नाही. ग्रामपंचायतीच्या बैठकीत ठराव झाला नाही. तरी या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
Kolhapur News: जोतिबा डोंगरावरील रस्त्यावर बेकायदा खुदाई, कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 1:03 PM