कोल्हापूर : शहरात तीन ठिकाणी सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर एकाच वेळी छापे टाकत पुरवठा विभागाने ७३ घरगुती गॅस सिलिंडर पाच रिफिलिंग मोटर्स, चार वजन काटे असे अंदाजे १ लाख ४५ हजारांचे साहित्य जप्त केले. हे स्टेशन चालविणाऱ्या तीनही मालकांवर आयपीसी कलम २८५, २८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम तीन व पाच अन्वये गुन्हा दाखल केला. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न धान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांच्या पथकाने आज, शनिवारी सकाळी ही कारवाई केली. उद्यम नगरात महादेव खंडेराव शिंदे, रंकाळा स्टॅन्ड मागे साई बाबा मंदिराजवळ नारायण सुगंधराव कांबळे तसेच दसरा चौक परिसरातील मुस्लिम बोर्डिंग येथील तानाजी तुकाराम आरडे यांच्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर सकाळी छापा टाकण्यात आला. गणपती मंदिर व मुस्लिम बोर्डिंग अशा संवेदनशील ठिकाणांना लागूनच असलेल्या या सेंटरमुळे दुर्घटना घडल्यास मोठी जीवित वित्तहानी होण्याचा धोका होता.ग्राहक दक्षता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या तक्रारीनंतर १५ मे रोजी मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली येथे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षकांना शहरात अनेक ठिकाणी असे अवैध गॅस रिफिलिंग स्टेशन असल्याची माहिती मिळाली. कारवाईसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना अतिरिक्त कर्मचारी देण्याची विनंती केली.
चव्हाण यांनी तात्काळ दोन मंडळ अधिकारी, एक पुरवठा निरीक्षक दिले. तसेच संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून गरज भासल्यास पोलीस बंदोबस्त पुरवण्याची सूचना दिली. ठरल्यानुसार शनिवारी ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी अशा अवैध गॅस रिफिलिंग सेंटरची माहिती जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.