कोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली बायपास रोडवर उदगाव गावानजीक पोलिसांनी अवैधरीत्या होणारी गुटखा वाहतूक रोखली. कारवाईत सुमारे ११ लाख ५७ हजारांचा गुटखा तसेच टेम्पो असा सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी सायंकाळी केली. कारवाईत पोलिसांनी वाहनचालक उदय दत्तात्रय माने (वय ५३, रा. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर ते सांगली जाणाऱ्या बायपास मार्गावरून अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस पथक पाठवून बायपास मार्गावर उदगाव गावच्या हद्दीत सापळा रचला. सायंकाळी सांगलीकडून कोल्हापूरकडे येणारा एक टेम्पो पकडला. त्याची तपासणी केली असता त्यामधून बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक केली जात असल्याचे आढळले. तपासणीत टेम्पोमध्ये दोन विविध कंपन्यांचा पानमसाला, कंपनीचा तंबाखू, सुगंधी सुपारी असा सुमारे ११ लाख ५७ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला. पोलिसांनी गुटखासह टेम्पो असा सुमारे २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. टेम्पोचालक उदय माने याला जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हेे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पो. कॉ. अमोल कोळेकर, अजित वाडेकर, संतोष पाटील, संजय पडवळ, नितीन चोथे, अर्जुन बंद्रे, रामचंद्र कोळी, सागर कांडगावे, ओंकार परब, संदीप कुंभार या पथकाने केली.
फोटो नं. २७०२२०२१-कोल-क्राईम०१
ओळ : कोल्हापूर ते सांगली बायपास मार्गावर उदगाव येथे सुमारे ११ लाखांच्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला. अटक केलेला वाहनचालक.