२.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील मरगूबाई मंदिर परिसरातून कर्नाटकातून आणलेला गुटखा बेकायदेशीररीत्या कारमधून वाहतूक करणाऱ्या पाच जणांना पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला आणि चारचाकी गाडी असा दोन लाख ७० हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रवींद्र शिवाजी पेरनोळे (वय ३७, रा. गणेशनगर), संतोष शिवाजी गावकर (३१), शरद अशोक बेकरे (२६, दोघे रा. दत्तनगर-शहापूर), वीरभद्र महारुद्र कोष्टी (३१) व अजित विश्वनाथ भंडारे (३२, दोघे रा. जवाहरनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना वरील पाच जणांनी कर्नाटकातील बोरगाव येथून मोठ्या प्रमाणात गुटखा कार (एमएच ०९ एबी ०४५५) मधून बेकायदेशीर शहरात आणला जात होता. पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने संशयावरून नदी वेस नाका परिसरातील मरगूबाई मंदिराजवळ या कारला रोखले. तपासणी केली असता डिग्गीमध्ये व सीटखाली असा मोठ्या प्रमाणात गुटख्याची पोती ठेवल्याचे आढळले. त्यामध्ये आरएमडी, टॉप स्टार, मुसाफीर, विमल, रजनीगंधा, तुलसी अशा विविध कंपन्यांचा एक लाख ३० हजार रुपयांचा गुटखा व एक लाख ४० हजार रुपयांची कार जप्त केली. पथकामध्ये सुनील पाटील, जावेद आंबेकरी, सागर हारगुले, अल्ताफ सय्यद यांचा समावेश होता. ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला.
फोटो ओळी
२३०२२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करून बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त केला.