शिरोळ - तालुक्यातील कृष्णा नदीचे पात्र कमी झाले आहे. यामुळे नदीपात्रातील वाळू ही उघड्यावर पडली असून वाळू तस्करांनी यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. औरवाड पाणवठा नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर व गौरवाड येथील पाणवठ्यावर रात्री शेकडो वाळू तस्करांकडून मोटारसायकलमधून पोत्यातून वाळू चोरी केली जात आहे. यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नदीचे पात्र रुंद होऊन मंदिराच्या घाटाला धोका पोहोचला आहे. याबाबत मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडे तक्रार करूनदेखील अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लेडी सिंघम तहसीलदार अर्पणा मोरे-धुमाळ पुन्हा कारवाई करणार का ?
२०१९ साली महापुरानंतर सुरू असलेल्या वाळू चोरीवर तहसीलदार अर्पणा मोरे-धुमाळ यांनी पहाटे कारवाई करून वाळूचे डेपो जप्त केले होते. यानंतर महसूल कर्मचारी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने पुन्हा वाळू चोरी सुरू झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.
कुंपणच शेत खातं..
पर्यावरण विभागाने नदी प्रदूषणाचे कारण देत वाळू बंदी पाच वर्षांपूर्वी केली आहे. असे असताना शिरोळ तालुक्यातील नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या तस्करीत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तस्कर व नृसिंहवाडी - औरवाड पुलावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची साखळी असून ' कुंपणच शेत खातं' असल्याने यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.