इंगळी : येथे अवैध माती उत्खनन करणाऱ्यांंविरोधात केवळ कारवाईचा बनाव करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. महसूल कर्मचाऱ्याकडूनच संगनमताने लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाचे नुकसान केले जाते आहे.
येथील पंचगंगा नदीच्या काठावर इंगळी-चंदूरदरम्यान मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले जात आहे.
महसूल भरून उत्खननाची परवानगी घेतली जाते; पण शासनाने मंजूर केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक माती काढली जात आहे व त्याकडे महसूल कर्मचारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. काही ठिकाणी ३० ते ४० फूट खोल उत्खनन केले आहे. नदीच्या पाणीपातळीपर्यंत खोदल्याने त्याठिकाणी पाण्याचा पाझर होऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीही त्यामध्ये ढासळत आहेत. त्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्याठिकाणी कारवाई केल्याचा केवळ बनाव केला जातो व पुन्हा उत्खनन केले जाते. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून २० नोव्हेंबर रोजी महसूल विभागाने अवैध माती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली, पंचनामा करून दंड आकारणी केली. मात्र, केवळ कागदावरच. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. २०० ब्रास माती उत्खननाची परवानगी मिळाली असता परवानगीच्या दहा पट अधिक माती उचल केली असल्याचे निदर्शनास येत आहे व त्यांचा अन्य शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
फोटो ओळी
२६०२२०२१-आयसीएच-०४
२६०२२०२१-आयसीएच-०५
इंगळी (ता.हातकणंगले) येथे अवैध माती उत्खनन जोरात सुरू आहे.