आजरा : आजरा शहरामध्ये चंदनाच्या लाकडाच्या तुकड्यांचा अवैध साठा करून विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाने अटक केली आहे. राजेंद्र परशराम चंदनवाले व विनायक राजेंद्र चंदनवाले (दोघेही सिध्दीविनायक काॅलनी आजरा) यांच्याकडून चंदनाच्या लाकडाचे १९ किलोचे तुकडे, इलेक्ट्रिक वजनकाटा व दोन मोबाईल यासह २५ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.याबाबत माहिती अशी की, आजरा शहरात अवैधरीत्या चंदनाच्या लाकडाची विक्री होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून चंदनाची लाकडाच्या खरेदीबाबत व्यवहार केला. चंदनाच्या लाकडाची खात्री झालेनंतर वन विभागाच्या पथकाने राजेंद्र चंदनवाले यांच्या घरी धाड टाकून विक्रीसाठी आणलेले १९ किलोचे चंदनाचे लाकडाचे तुकडे, इलेक्ट्रिक वजन काटा व दोन मोबाईल जप्त केले.सदरची कारवाई उपवनसंरक्षक आर. आर. काळे, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, मानद वन्यजीव रक्षक जीवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बाळेश न्हावी, कृष्णा डेळेकर, रणजित पाटील, सुनील भंडारी, प्रियांका पाटील, नम्रता दंडगीदास, कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे, मारुती शिंदे, शिवाजी मटकर यांनी केली. याचा पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके करीत आहेत.
आजऱ्यात वनविभागाची मोठी कारवाई, चंदनाच्या लाकडाचा अवैद्य साठा केला जप्त, दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 2:13 PM