म्हासुर्ली : दाजीपूर अभयारण्याच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मानबेट (ता. राधानगरी) येथे अवैधरीत्या सुरू असणारा स्टोन क्रशर अखेर महसूल प्रशासनाकडून सील करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणावर दगड खडी, दोन ट्रॅक्टर व दोन जेसीबी जप्त करण्यात आले आहेत. याबाबत बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने महसूल प्रशासन खडबडून जागे झाले.
चौके, मानबेट, राही, कंदलगाव या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या मानबेट गावानजीक डवरी यांच्या शेतामध्ये रस्ता कामाच्या नावाखाली गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही परवानगीशिवाय व रॉयल्टी न भरता अवैधरीत्या स्टोन क्रशर सुरू असून, मोठ्या प्रमाणावर खडीची निर्मिती करून ती परिसरात विकली जात होती. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला होता. शासनाचीही लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी सविस्तर प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन नायब तहसीलदार विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुपारी मानबेटयेथील क्रशरच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून क्रशर सील केलाआहे.तहसीलदारांकडून पुढील कारवाईयाबाबत राधानगरीचे नायब तहसीलदार विजय जाधव म्हणाले, बुधवारी आम्ही मानबेट या ठिकाणी क्रशरची पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची परवानगी आढळून आली नाही. हा क्रशर सील केला असून, दोन ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी तसेच दगड आणि खडी जप्त केली आहे. याबाबतचा अहवाल तहसीलदारांना देणार असून, पुढील कारवाई तहसीलदार यांच्याकडून होईल.