इंदुमती गणेशकोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सभामंडप व स्वच्छतागृहाचे साडे तीन कोटींचे काम बेकायदेशीररीत्या खासगी कंपनीकडे सोपवून त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. धर्मादायच्याच अधिकाऱ्याकडून झालेल्या या नियमबाह्य कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अतितत्काळ शेरा मारून धर्मादाय उपायुक्त व भुदरगड तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत.बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सभामंडप व स्वच्छतागृह बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आधी निविदेद्वारे वास्तुविशारद व्यक्तीची नियुक्ती करून त्यांच्याकडून आराखडा, ड्रॉइंग, थ्रीडी ड्रॉइंग घेऊन त्यानुसार ट्रस्टच्या इंजिनीअरने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक करून त्याला प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असते. हे सगळं टाळून सांगलीतील पिनाका कन्सल्टन्सी सर्व्हिस या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनीकडे काम सोपवले. त्यांच्या माध्यमातून निविदा भरायची सांगलीत आणि ती उघडणार आदमापुरात असा वाईवरून साताऱ्याचा प्रकार केल्याने हेतूबद्दलच शंका येते. हे कळताच एका भक्ताने धर्मादाय उपायुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
जिल्हाधिकाऱ्यांचा अतितत्काळ आदेशजिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतितत्काळ म्हणून धर्मादाय उपायुक्त व भुदरगड तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रकरण तपासून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, त्याची एक प्रत या कार्यालयाकडे सादर करावी, असा आदेश दिला आहे. भुदरगड तहसीलदारांनी मंगळवारी चौकशी लावली आहे.
सुट्टीच्या तीन दिवसांची मुदतट्रस्टने १ फेब्रुवारीला ३ कोटी ४५ लाख २३ हजार ४८७ ची निविदा प्रसिद्ध केली. यात निविदा भरण्यासाठी १, २ व ३ फेब्रुवारी या तीनच दिवसांची मुदत दिली. यातील शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस आहेत.
निविदा रद्दतक्रार झाल्याचे कळताच ट्रस्टने १ फेब्रुवारीला काढलेली निविदा रद्द केली आहे. ४ तारखेला निविदा उघडण्यात येणार होत्या, त्याच दिवशी त्या निविदा भरलेल्यांना परत देण्यात आल्या.
ट्रस्टने सतीश कमाने यांची आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती केली आहे. पिनाका हे त्यांच्या फर्मचे नाव आहे. मार्चमधील भंडाऱ्याच्या आधी सभामंडप तयार व्हावा यासाठी निविदेचा कालावधी कमी केला होता. मात्र, हेतुपुरस्सर तक्रार केली आहे, निविदा प्रक्रिया बेकायदेशीर नाही. तरीही नव्याने निविदा काढल्या जाणार आहेत. - रागिणी खडके कार्याध्यक्ष, सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्ट,