हातकणंगले : हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २७ गावांमध्ये लॉकडाऊनमध्ये बंद असलेले अवैध धंदे नव्या जोमाने सुरू झाले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखाकडून महिन्यामध्ये दहा-बारा वेळा धाडी टाकून कारवाई झाली; तरीही हातकणंगले पोलीस दुसऱ्याच कामात व्यस्त आहेत.
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुटखा, मटका, दारूअड्डे, वेश्या व्यवसाय खुलेआमपणे सुरू असून हातकणंगले पोलिसांचा मात्र त्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा असल्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या दोन महिन्यांत अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी व एलसीबीने हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ते बारा वेळा कारवाया करीत हातकणंगले पोलिसांची कार्यक्षमता चव्हाट्यावर आणली.
लॉकडाऊनच्या काळात २२ जून २०२० रोजी प्राणिल गिल्डा यांची हातकणंगले येथे परिक्षेत्रीय पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासून ३ सप्टेंबर २०२० पर्यंत ७५ दिवसांत ६७ कारवाया करीत त्यांनी गुन्हेगारीवर वचक ठेवला होता. मात्र त्यांची इतरत्र नियुक्ती झाली आणि दरम्यानच्या काळात लॉकडाऊनही काहीसे शिथिल झाले. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीने परत डोके वर काढले आहे.
गुटखा सर्वत्र खुलेआम विकला जात असून, त्यासाठी काही तडजोडी झाल्या आहेत. मोबाईलवरून मटका राजरोसपणे सुरू आहे. गावठी दारूचे अड्डे, अवैध दारूविक्री खुलेआमपणे सुरू आहे. वेश्या व्यवसायही जोमात सुरू असून त्यामध्ये आरोपीला पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैजणे, एलसीबीने गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवायांनी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या गुन्हेगारीचा पाढाच समोर ठेवला आहे.
कोट...
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत वरिष्ठांकडून चौकशी समिती नियुक्त करून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांचा अहवाल पाठविला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- जयश्री गायकवाड
अप्पर पोलीस अधीक्षक