इचलकरंजी : गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या कारचालकाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडले. या प्रकरणी चालकासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनिकेत सुधाकर मांगलेकर (वय १८), निशिकांत शशिकांत वासुदेव (१९, दोघे रा. केटकाळे गल्ली), कृष्णा नामदेव खामकर (२०, रा. वर्धमान चौक) व स्वप्निल सुरेशा चेंडके (१९, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नदीवेस नाका ते शेळके मळा येथून कार (एमएच १४ एएम ८४२५) जात होती. शिवाजीनगर पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयावरून ती अडविली. कारच्या तपासणीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. एक लाख ४३ हजार ६८८ रुपयांसह ६० हजार रुपयांची कार जप्त केली.
अनिकेत मांगलेकर, कृष्णा खामकर व निशिकांत वासुदेव या तिघांनी शिवनाकवाडीमधील स्वप्निल चेंडके याच्या दुकानातून हा माल खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.