गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरालगतच्या धबधबा मार्गावरील अतिक्रमित रस्त्याच्या जमिनीचे सुरू असलेल्या बेकायदेशीर हस्तांतरणाची चौकशी करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी येथील प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.
अधिक माहिती अशी, बड्याचीवाडी गावठाणापासून लाखेनगरपर्यंत १२ मीटर रुंदीच्या रस्त्याची जिल्हा मार्ग म्हणून बांधकाम विभागाकडे नोंद आहे. हा रस्ता महमदहनिफ काशीम मुल्ला यांच्या मालकीच्या गटनंबर ३९१/२ या बिगरशेती क्षेत्राच्या पश्चिम बाजूलगत आहे. त्यानंतर संतराम कृष्णा सोले यांची जमीन आहे.
दरम्यान, अलीकडे सोले यांनी धबधबा मार्गावर अतिक्रमण करून ती जमीन आपल्या जमिनीत समाविष्ट करून त्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासंदर्भात मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
---------------------------------
* पालखी मार्गावर अतिक्रमण
गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव यात्रेच्या आदल्या दिवशी दरवर्षी ‘श्रीं’ची पालखी शहरातील मंदिरापासून धबधबा मार्गावरूनच डोंगराकडे जाते. या रस्त्याच्या जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री थांबवावी आणि अतिक्रमण हटवावे, अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.
-----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज शहरालगतच्या धबधबा मार्गावरील याच रस्त्याच्या अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
क्रमांक : २१०३२०२१-गड-१०