कोल्हापूर : कागल तालुक्यातील गडहिंग्लज-कापशी रोडवर तमनाकवाडा बाळेघोल तिट्ट्यावर छापा टाकून एका स्कॉर्पिओ वाहनातून दुसऱ्या वाहनात बेकायदेशीर गोवा बनावट मद्याच्या बॉक्सची देवाण-घेवाण करताना सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ३१ हजार किमतीचे विदेशी मद्य, मोबाईल, तसेच स्कॉर्पिओ वाहन असा सुमारे १६ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास केली.पथकाने दिलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक संध्याराणी देशमुख, उपअधीक्षक बापूसाहेब चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकास, गडहिंग्लज - कापशी रोडवरून काहीजण बेकायदा गोवा बनावट मद्याची अवैधरित्या चोरटी वाहतूक करून मद्याची देवाण-घेवाण करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या मार्गावर पथके पाळत ठेवून होती.
सोमवारी पहाटेच्या सुमारास गडहिंग्लज-कापशी रोडवर तमनाकवाडा बाळेघोल तिट्ट्यावर काहीं व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. पथकाने तेथे छापा टाकला., त्यावेळी एका स्कॉर्पिओ वाहनातून दुसऱ्या वाहनात गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स ठेवत असल्याचे आाढळले. तत्काळ पोलिसांनी तेथील सात जणांना अटक केली.या छाप्यात चारचाकी वाहनामधील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डच्या ७५० मि.लि. क्षमतेचे सुमारे ६ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचे १०३ बॉक्स, मोबाईल तसेच वाहन, असा सुमारे १६ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान सर्वश्री संदीप जानकर, मारुती पोवार, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे करत आहेत.अटक केलेले मद्य तस्कर...अटक केलेल्या संशयितांमध्ये: निखिल ऊर्फ बल्या दत्ता रेडेकर (वय २९), स्वप्नील परसराम कांबळे (२३ ), राहुल गणपती कुंभार (२५, रा. बटकणंगले, मेन रोड, ता. गडहिंग्लज), अमोल आनंदा तिप्पे (३१, रा. तमनाकवाडा, तिप्पे गल्ली, ता. कागल), मंगेश अमरदास खाडे (३०, रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड), अमर लक्ष्मण नाईक (३४, रा. कोळिंद्रे, ता. आजरा), बाळकृष्ण शंकर सुळेभावीकर (३२, रा. जांभुळवाडी, ता. गडहिंग्लज) यांचा समावेश आहे.