आजरा :
कोरोनाची लस देण्यासाठी आजरा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. कोरोनाची लस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साठवणूक केली जाणार आहे. आजरा तालुक्यासाठी कोरोनाची लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होणार आहे. कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, खासगी डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना दिली जाणार आहे. कोरोना लसीबाबत नागरिकांचे असणारे गैरसमज, लस देण्याची पद्धत, त्यासाठी पाचजणांची असणारी समिती, याबाबत प्रशिक्षणात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी माहिती दिली.
प्रशिक्षणात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्रांचे समुदाय आरोग्य अधिकारी असे ९० कर्मचारी सहभागी झाले होते.
कोरोनाची लस देताना संबंधित व्यक्तीला मोबाईलवर मेसेज दिला जाईल. त्यानंतर सांगितलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यक्तीने लस घ्यावयाची आहे. ---------------------------
* कोरोनाची उपलब्ध होणारी लस ही ऐच्छिक आहे. ज्यांना आवश्यकता आहे किंवा कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना १४ दिवसांनंतर ही लस दिली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
* कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. लसीची साठवणूक प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाणार आहे. प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे ही लस दिली जाणार आहे. उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांना लसीबाबत माहिती दिली जाणार आहे.
डॉ. यशवंत सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, आजरा.