कोल्हापूर : सुंदर आकाशकंदील, होई हा विराजमान, उजळला हा आसमंत, पणत्यांच्या प्रकाशाने सुरेख, सुंदर रांगोळीने, सजले हे अंगण, रांगोळीत होई, विविध रंगांची उधळण असे हे दिवाळीचे प्रत्यक्ष वर्णन. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेले आसमंत, आतषबाजीच्या विविध रंगांनी प्रकाशमय झालेले आकाश असा मनोहारी आविष्कार कोल्हापूर शहरात रविवारी रात्री उशिरापर्यंत अनुभवयास मिळाला.
प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळीचा सण शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीमुळे संपूर्ण शहरात सध्या चैतन्याचे, मांगल्याचे वातावरण आहे. रविवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने घरोघरी, तसेच व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजा झाल्यानंतर संपूर्ण शहर फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघाले. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आवाजाने अवघे शहर दणाणून गेले होते. आकाशकंदील व विजेच्या माळांमुळे अवघे नगर उजळून निघाले आहे.
अंगणात सडा टाकून रेखाटलेल्या रांगोळ्या, पणत्यांनी केलेली सजावट, शुभेच्छांची देवघेव, फराळाची निमंत्रणे यामुळे सध्या उत्सवी वातावरण आहे. नवे कपडे घालून लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, महानगरपालिका चौक, शाहूपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी रविवारी सकाळी मोठी गर्दी केली होती.
मिठाई खरेदीसाठी झुंबडलक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजेसाठी मिठाई खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानात झुंबड उडाली आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असल्यामुळे यंदा मोठी उलाढाल झाली. शहरातील नोकरदार वर्गाने कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व फर्निचरच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. वाहनांच्या शोरूममध्येही मोठी गर्दी होती.
आकाशकंदील...विद्युत रोषणाई
धनत्रयोदशीपासून दारात दिवे लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे दारात लावलेल्या पणत्यांचा मंद प्रकाश दिवाळीचा आनंद घेऊन आला आहे. आकाशकंदील, विद्युत रोषणाई आणि पणत्यांच्या प्रकाशाने अवघे कोल्हापूर प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघाले आहे. रोषणाई, फुलांच्या माळा, शोभेचे आकाशकंदील, रंगरंगोटी, साफसफाईने घराचा कायापालटच झाला आहे. बेसन-कळीचे लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा असा स्वादिष्ट फराळावर ताव मारण्यापूर्वी महिलांनी साफसफाई करवून घेतलेले घर अधिकाधिक सुंदर बनले आहे. मुलांनी सुरेख सजावटी करून आपले कौशल्य पणाला लावले आहे. लहान मुलांचा उत्साह तर ओसंडून वाहत आहे.