कोल्हापूर: प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने ५० हजारांची प्रोत्साहनपर रक्कम जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष परवडणार नाही, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी राज्य सरकारला दिला आहे. शनिवारी किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
निवेदनात काटे यांनी म्हटले आहे, की राज्य सरकारने सत्तेवर येताना कर्जमाफी झाल्यानंतर ज्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली आहे, त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती, पण अद्याप ती रक्कम जमा झालेली नाही. आता खरीप पेरण्यांची तयारी सुरू आहे. मशागती व बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री झालेली नसल्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसानेही उन्हाळी पिकाचे नुकसान केले आहे. अशा परिस्थितीत त्यांना पैशाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत न पाहता ही रक्कम तातडीने जमा करावी, अन्यथा प्रचंड रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात युवराज पाटील, पृथ्वीराज यादव यांचा समावेश होता.