जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावामध्ये त्वरित लसीकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरवर्षी अनेक गावे पुराच्या तडाख्यात सापडून मोठ्या प्रमाणात हानी होत असते. तालुक्यात अद्यापही संथ गतीने लसीकरण सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ होत आहे. तालुक्यामध्ये आरोग्य सेवाही कमी आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा नदीकाठच्या गावामध्ये प्राधान्याने संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. तालुक्यात जवळपास २८ गावेही पुराच्या तडाख्यात सापडतात. संबंधित गावातील दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडते. त्यामुळे संभाव्य महापुराच्या अगोदर पूरग्रस्त गावातील नागरिकांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनावर सागर संभूशेटे, अजित पाटील, रामभाऊ शिंदे, सचिन शिंदे, उत्तम माळी, स्वप्नील माळी, भरत डंके, मायगोंडा पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - ०९०७२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सागर संभूशेटे, अजित पाटील, रामभाऊ शिंदे, सचिन शिंदे, उत्तम माळी, स्वप्नील माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.