कोल्हापूर : गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण करण्यात आल्या. या ठिकाणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिवसभर थांबून होते.पुर ओसरल्यानंतर पंचगंगा घाटावरील गाळ युध्दपातळीवर काढून अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे पाणी मारुन घाटपरिसराची व या येणा-य मागार्ची स्वच्छता करण्यात आली. यानंतर विर्सजन मिरवणूक गतीने सुरु झाली. तसेच रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व अडथळे हटविण्यात आले होते.
विसर्जन ठिकाणी वीजेची व्यवस्था करण्यात आली होती. पंचगंगा नदी घाट येथे अर्पण करण्यात येणाऱ्या गणेश मुर्ती ठेवणेसाठी मंडप उभारण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी पोलीस, अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा रक्षक, पवडी विभाग, आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात होते. त्याचबरोबर ट्रॅक्टर, डंपर, जे.सी.बी., रुग्णवाहिका, पाण्याचे टॅकर, बोटी, विद्युत विभागाकडील बुम, रेस्कयु व्हॅन अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवणेची व्यवस्था करण्यात आली होती.पंचगंगा नदी घाट येथे पूराचे पाणी असल्याने तराफ्यावरुन गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे काम महापालिकेकडून सुरु होते. त्याचबरोबर या परिसरात आपत्कालिन विभागाच्या बोटी व जवान कार्यरत होते.
गुरुवारी (दि.१२) सकाळी आठच्या सुमारास पहिल्या गणपतीचे विसर्जन झाले. शुक्रवारी पहाटेपर्यंत या ठिकाणी ४१० मूर्तींचे विसर्जन झाले. त्याचबरोबर महापालिकेने केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण आवाहनासही चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये ११५ मूर्ती अपर्ण झाल्या.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आवाहनपंचगंगा नदी घाटावर डॉ. नानासाहेब धर्माधिकाररी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य कलश उभारण्यात आला होता. या ठिकाणी ‘पर्यावरण संरक्षणाकरीता निर्माल्य कलशामध्ये टाकावेत’ असा लावलेला फलक विसर्जनासाठी येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.